- एकूण वजन : 16000kg
- अशोक स्तंभाचे वजन : 9500 kg
- सहाय्यक संरचनेच वजन : 6500 kg
- रुंदी : 3.3-4.3 मीटर {सुमारे 11 ते 14 फुट ]
- ऊंची : 33 मीटर { 108 फुट }
- कुठे स्थापना केली : नवीन संसद भवनच्या छतावर
- कुठे बनवली : संभाजीनगर ,जयपूर ,दिल्ली
नवीन संसद भवनासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा
पीटीआय, नवी दिल्ली : नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. कांस्य धातूपासून निर्मिती केलेल्या या बोधचिन्हाचे वजन साडेनऊ हजार किलो आहे आणि त्याची उंची साडेसहा मीटर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अनावरणप्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की या वर्षांच्या अखेरीस नवीन संसद भवनाचे कामकाज सुरू होण्याआधी हा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत करण्याचे नियोजन आहे.
नवीन संसद भवनाच्या दर्शनी भागावर हे राष्ट्रीय बोधचिन्ह उभारले जाणार आहे. त्याला आधार देण्यासाठी सुमारे सहा हजार किलो वजनाची पोलादी रचना तयार करण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बोधचिन्ह निर्मितीची प्रक्रिया या चिन्हाचे मातीचे प्रारूप, संगणकीय रचनेपासून ते कांस्य धातूचे ओतकाम (कास्टिंग) आणि मुलाम्यापर्यंत विविध आठ टप्प्यांत झाली आहे.
बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या बांधकामात सहभागी कामगारांशी संवाद साधला. ते कामगारांना म्हणाले, की तुम्ही अभिमानास्पद कामगिरी करत आहात. देशासाठी अभिमानास्पद वास्तूची उभारणी तुमच्या हातांनी होत आहे. पंतप्रधानांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे, की संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या कामगारांशी माझा खूप चांगला संवाद झाला. आम्हाला त्यांच्या प्रयत्नांचा अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.
‘आम्ही इतिहास बांधत आहोत!’
जेव्हा मोदींनी कामगारांना विचारले की ते इमारत बांधत आहेत की इतिहास, त्यांना काय वाटते? त्यावर कामगार एकमुखाने म्हणाले, की ‘इतिहास!’. संसद भवनाच्या बांधकामात आणि इतर कोणत्याही प्रकल्पाच्या बांधकामात सहभागी होण्यात काय फरक आहे, असेही पंतप्रधानांनी कामगारांना विचारले. त्यावर उत्तर देताना नवीन संसद भवनाच्या उभारणीचे काम करताना अभिमान वाटत असल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले. मोदींनी कामगारांची विचारपूस करून त्यांना करोना प्रतिबंधक लस मिळाली आहे का, याचीही विचारणा केली. ‘प्रत्येक गरिबाला संसद आपली झोपडी वाटावी!’ एका मजुराने बांधकामाच्या ठिकाणी पंतप्रधानांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केला. आपली भावना व्यक्त करतान तो उत्साहाने मोदींना उद्देशून म्हणाला, की हे जणू भगवान श्रीराम शबरीच्या झोपडीत आल्यासारखेच झाले. त्यावर मोदी दाद देत म्हणाले, ‘वा, ही तुमची झोपडी आहे तर. तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला. देशातील प्रत्येक गरिबालाही ही आपली झोपडी आहे, असे वाटले पाहिजे.’